नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंह बादल यांच्यावर गुरुवारी नांदेडमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली. शहरातील माता साहिब गुरुद्वारा परिसरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. हल्ल्यात बादल यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी यशोसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी बादल कुटुंबीय नांदेडला आले होते. माता साहिब गुरुद्वारा परिसरात गुरुवारी सुखबीरसिंह बादल यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
हल्ल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. हल्ल्याचे नेमके कारण काय, हल्लेखोराचा बादल यांच्याशी काही पूर्वीचा संबंध आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, सुखबीरसिंह बादल यांच्यावर यशोसाई हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर माता साहिब गुरुद्वारा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.